24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसंपादकीयप्रतीक्षा विश्वविजेतेपदाची!

प्रतीक्षा विश्वविजेतेपदाची!

अत्यंत धोकादायक मानल्या जाणा-या व भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कटू स्मृती जाग्या करणा-या न्यूझिलंड संघाला बुधवारी झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात ७० धावांनी दणदणीत पराभूत करून रोहित सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना जोरदार दिवाळी गिफ्ट दिले! चार वर्षांपूर्वी याच टप्प्यावर याच न्यूझिलंड संघाने भारताला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढले होते. या कटू स्मृतीचा दबाव न बाळगता रोहित सेनेने बुधवारी न्यूझिलंडचा हिशेब चुकता केला! त्यामुळे मागच्या ११ वर्षांत हुलकावणी देत असलेले विश्वविजेतेपद आता भारताच्या पुढ्यात आले आहे. आता तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा असेल ती रोहित सेनेने रविवारी अहमदाबादेत पुन्हा एकवार विश्वचषक उंचावण्याची! भारताचा विश्वविजेतेपदासाठीचा अंतिम सामना कुणाशी होणार याचा फैसला उपान्त्यफेरीच्या ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यातील सामन्यात होणार असला तरी या स्पर्धेतील भारतीय संघाची झालेली शानदार वाटचाल पाहता रोहित सेनेला त्याची फारशी चिंता नसावीच! कारण साखळी टप्प्यात रोहित सेनेने स्पर्धेत सहभागी सर्वच संघांवर अक्षरश: एकतर्फी विजय मिळवून आपली जोरदार तयारी सिद्धच केली आहे.

द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना रोहित सेनेने साखळी सामन्यांत जोरदार दणका दिलेलाच आहे. त्यामुळे भारतीय संघापेक्षा अंतिम फेरीत भारताविरुद्ध मैदानात उतरणा-या संघावरच जास्त दडपण असणार आहे. भारताची या स्पर्धेत सलग १० विजय मिळवत अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीची आठवण करून देणारीच आहे. किंबहुना भारताची या स्पर्धेतील कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीपेक्षा काकणभर सरसच ठरली आहे. स्पर्धेत भारतीय फलंदाज व गोलंदाजांची कामगिरी एवढी सरस झाली आहे की, विजयाचे श्रेय फलंदाजांना द्यायचे की गोलंदाजांना, हे तज्ज्ञांनाही सहजासहजी ठरवता येत नाही. थोडक्यात भारताचा एकूण संघच सध्या फुल्ल फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीला फलंदाजी केली तर भारताचे फॉर्ममध्ये असलेली टॉप ऑर्डर फलंदाज धावांचा रतीब घालून गोलंदाजांवर धावा रोखण्याचे दडपण येणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करत आहे. तर प्रथम गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी संघाला झटपट गुंडाळून आपल्या फलंदाजांना अशक्यप्राय धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार नाही, याची पुरेपूर काळजी भारतीय गोलंदाज घेत आहेत.

ही संघभावनाच भारतीय संघाच्या या स्पर्धेतील अफलातून कामगिरीचे रहस्य आहे. याचे श्रेय जेवढे संघातील प्रत्येक खेळाडूला तेवढेच या संघातील प्रत्येक खेळाडूला भक्कम पाठिंबा देणा-या प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मासह संघ व्यवस्थापनास जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रशिक्षक व कर्णधारावर पूर्ण विश्वास टाकून त्यांना संघनिवडीचे स्वातंत्र्य दिले. हा विश्वास भारतीय संघाने टीम स्पिरीट दाखवून सार्थ ठरवला आहे. हा प्रवास साकारताना अनेक विक्रम मोडले जाणे व नवे विक्रम स्थापन होणे अटळच! तसे ते झालेही! विराट कोहलीने वन-डेमध्ये शतकांच्या अर्धशतकांचा अशक्यप्राय वाटणारा विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावावर झाला आहे. या स्पर्धेत त्याने तीन शतके ठोकली आहेत. त्यावेळी त्याच्यासोबत मैदानावर श्रेयस अय्यर व के. एल. राहुल होते. आपल्या या कामगिरीत या दोघांचा मोठा वाटा आहे, ही विराटची प्रतिक्रिया भारतीय खेळाडूंमध्ये रुजलेल्या ‘सेल्फलेस’ मूल्याची प्रचिती देणारी आहे. विक्रमांपेक्षा व शतके नावावर करण्यापेक्षा संघाचा विजय व त्यासाठीचे सर्वोच्च योगदान महत्त्वाचे, हे मूल्य या भारतीय संघात खोलवर रुजवण्यात संघ व्यवस्थापन पूर्णपणे यशस्वी झाल्यानेच भारतीय संघाची कामगिरी एवढी उंचावली आहे.

पहिले तीन सामने बाकावर बसून राहावे लागलेला मोहम्मद शामी म्हणूनच मैदानात उतरल्यावर प्रत्येक सामन्यात शानदार कामगिरी करत विक्रम रचतोय व संघाच्या विजयात अमूल्य योगदान देतोय. उपकर्णधार हार्दिक पांड्या जखमी झाल्याने संघ अडचणीत असल्याची कुठलीही जाणीव ना मोहम्मद शामीने होऊ दिली ना सूर्यकुमार यादवने! संघाच्या विजयासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कामगिरीत सर्वोच्च योगदान द्यायचे हीच ईर्षा सध्या प्रत्येक भारतीय खेळाडूत ओतप्रोत भरलेली दिसते आहे आणि म्हणूनच संघ सर्वोच्च सांघिक कामगिरी करतोय! त्यामुळेच संघातील प्रत्येक खेळाडू कुठल्या ना कुठल्या सामन्यात मॅच विनर कामगिरी करतोय! हे घडले ते कर्णधार रोहित शर्मामुळे! त्याने ‘सेल्फलेस’ खेळ करण्याच्या सिद्धांताचा पाया स्वत:च्या कामगिरीतून रचला. पहिल्या १० षटकांत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवून जास्तीत जास्त धावा करायच्या व त्यांच्यावर दडपण निर्माण करायचे ही राजनीती संघ व्यवस्थापनाने निश्चित केल्यावर स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीवर अथवा विक्रमांवर अजिबात लक्ष केंद्रित न करता कर्णधार रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात आपली जबाबदारी चोख पार पाडत संघाला वेगवान सुरुवात करून दिली.

शुभमन गिलनेही त्याला तेवढीच जोरदार साथ दिली. परिणामी या स्पर्धेत या दोघांच्या नावावर आजवर एकही शतक लागले नसले तरी भारतीय संघ प्रत्येक सामना एकतर्फीच ठरावा अशा पद्धतीने जिंकत राहिला. कॅप्टन आणि लीडर यातला फरक रोहित शर्माने स्वत:च्या कामगिरीतून दाखवून दिला आहे आणि त्यातूनच हे टीम स्पिरीट निर्माण झाले आहे. त्यामुळेच पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याच्या जवळ भारतीय संघ पोहोचला आहे. २००३ व २००७ या दोन सलग स्पर्धांमध्ये सलग ११ विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाने विश्वविक्रम रचला होता. या स्पर्धेत भारताने आजवर दहा सामन्यांत विजय मिळविला आहे. सलग ११ वा सामना जिंकून भारत या स्पर्धेचे तिसरे विजेतेपद मिळवताना ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी साधणार का? याची प्रतीक्षा आता असणार आहे. अर्थात भारतीय संघाची स्पर्धेतील आजवरची कामगिरी पाहता व प्रत्येक खेळाडूतील आत्मविश्वास पाहता ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमी कामगिरीची बरोबरी अशक्यप्राय वाटत नाहीच! शिवाय रोहितच्या नेतृत्वाखालील हा संघ विश्वचषक उंचावण्याच्या समाधानापेक्षा काहीही कमी स्वीकारण्यास अजिबात तयार नाही, हेच उपान्त्य सामन्यातील दणदणीत विजयाने सिद्ध केलेच आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी तमाम भारतीयांना प्रतीक्षा असेल ती फक्त विश्वचषक उंचावून रोहित सेनेने विश्वविजेत्याच्या बिरुदावर शिक्कामोर्तब करण्याचीच!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR