चंदीगड : हरियाणातील नूह येथे पुन्हा एकदा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी रात्री काही महिला विहिरीच्या पूजेसाठी जात असताना यावेळी काही उपद्रवी तत्वांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दगडफेकीत किमान ८ महिला जखमी झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही पोलीस प्रशासनाने दिले आहे.
नूहचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांनी सांगितले की, मशिदीतील सीसीटीव्ही फुटेजवरून तीन मुलांची ओळख पटली आहे. तिन्ही मुले अल्पवयीन आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एफआयआर नोंदवण्यात आला असून मुलांची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर जातीय प्रभावित नूह शहरात तणाव वाढला आहे. या घटनेची माहिती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचताच निदर्शने सुरू झाली. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नुहचे आमदार आफताब अहमद घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मशिदीभोवती आणि नुह शहरातील मुख्य बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नुकतीच नूह येथे एक मोठी जातीय घटना घडली. ३१ जुलै रोजी मुस्लिमबहुल शहरात विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) मिरवणुकीवर जमावाने हल्ला केला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत सहा जण ठार झाले. मृतांमध्ये दोन होमगार्ड आणि एका मौलवीचा समावेश आहे.