24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात विजयाचा कौल कुणाकडे?

पुण्यात विजयाचा कौल कुणाकडे?

पुणे : विनायक कुलकर्णी
पुणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली असून विजयाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात ५३.५४ टक्के तर मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात ५४.१६ टक्के मतदान झाले आहे.

तीनही लोकसभा मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या असल्याकारणाने विजयाची समीकरणे मांडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ असून बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे चारही लोकसभा मतदारसंघातील विजयाचा कल महायुती की महाविकास आघाडी याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५९.२४ टक्के तर पर्वती विधानसभा मतदारसंघात ५५.४७ टक्के तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी ५०.६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात उरण विधानसभा मतदारसंघात सर्वांत जास्त म्हणजे ६७.०७ टक्के आणि कर्जत मतदारसंघात ६१.४० टक्के त्याचप्रमाणे पिंपरी मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५०.५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ६२.९५ टक्के आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघात ५८.१६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तसेच सर्वांत कमी हडपसर मतदारसंघात ४७.४१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

ज्या मतदारसंघात अधिक मतदान झाले आहे त्याबाबत नेमका कल कोणाकडे असणार आहे तर ज्या विधानसभा मतदारसंघात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले आहे त्याचा नेमका कोणता परिणाम होणार यावर उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. कोणत्या भागावर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व आहे यावर देखील गणिते अवलंबून असल्याने कार्यकर्ते त्यादृष्टीने मांडणी करीत असल्याचे दिसत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात सलग गेली दोन टर्म भाजपाचा विजय होत असून ही विजयी परंपरा या निवडणुकीत राखली जाणार का? तर बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यावेळच्या निवडणुकीत अवकाळी पाऊस, मतदार यादीत मतदारांची नावे नसणे तसेच मतदान यंत्रातील तात्पुरता बिघाड, वाढता उकाडा या बाबी देखील महत्त्वाच्या ठरल्या आहेत. काही लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली तर काही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबींचा नेमका निकालावर काय परिणाम होणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR