24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील आठवड्यात उष्णतेची अतितीव्र लाट!

पुढील आठवड्यात उष्णतेची अतितीव्र लाट!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १८ तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे १९ मे पासून राज्यात अतितीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी वर्तवली आहे तर काही भागात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुढील एका आठवड्यात अतितीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. १९ मे पासून हळूहळू तापमानात वाढ होणार आहे तर २०, २१ आणि २२ मेपासून राज्यातील काही भागांत तापमान ४५ अंश ते ४६ अंश अशा रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी वर्तवली आहे तर अनेक भागात तापमान ४३ अंश ते ४४ अंश राहणार आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर या भागात स्थानिक वळीव पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती विजय जायभावे यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगरसह अन्य काही भागांत पुढील दोन ते तीन दिवसांत वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. मात्र, १७ मे ते २५ मेपर्यंत या भागात अधिक तापमान वाढ होईल.

यासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर आदी भागांत तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ मेनंतर पुढील दोन ते तीन दिवस पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली भागात पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान तापमानातही वाढ होईल. तसेच मराठवाड्यात १५ मेपासून लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव दक्षिणेत जोरदार पाऊस होईल. जालना, बीड, परभणी या भागात स्थानिक वळीव पाऊस होईल. १६ मे पासून ते २४ मे या दरम्यान अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट राहील, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला.

एल निनोचा प्रभाव कमी
सध्या एल निनो कमी होत असून, १५ मे पर्यंत पूर्ण प्रभाव कमी होईल. हिंदी महासागरावर मात्र मे महिन्यात आयओडी (इंडियन ओशन डायपोल) पॉझिटिव्ह परिस्थितीत येणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आणि देशात मान्सून पूर्व (वळीव) पावसाचे प्रमाण मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरवातीला जास्त राहील, अशी माहिती विजय जायभावे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR