कानो : उत्तर नायजेरियाच्या कानो प्रदेशात एका व्यक्तीने स्थानिक बनावटीच्या स्फोटकांनी मशिदीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस प्रवक्ते अब्दुल्लाही हारुना यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ३८ वर्षीय स्थानिक रहिवासी असलेल्या संशयिताने कानो प्रदेशाच्या दुर्गम गदान गावातील मशिदीवर हल्ला केला. जखमींपैकी आठ जणांचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.
जखमींमध्ये चार लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक मतभेदानंतर त्या रागातून हल्ला केल्याची कबुली हल्लेखोराने दिली आहे. या घटनेमुळे उत्तर नायजेरियातील सर्वात मोठे राज्य असलेल्या कानो येथे घबराट निर्माण झाली आहे. कानो राज्यात वर्षानुवर्षे धर्माशी संबंधित मुद्यांवरून अधूनमधून अशांतता होत असते. तसेच अनेकदा धार्मिक मुद्द्यावरून हिंसाचार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
स्थानिक पोलिस प्रमुख ओमर सांडा यांनी पत्रकारांना सांगितले की, संशयिताने लोकल बनावटीच्या पद्धतीने बनवलेल्या बॉम्बने मशिदीवर हल्ला केला आणि स्फोट घडवून आणला. या हल्ल्याचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही. स्थानिक टीव्हीसी स्टेशनने प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये मुस्लिमबहुल कानो राज्यातील गदान गावातील मुख्य प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीमध्ये जळलेल्या भिंती आणि जळालेले फर्निचर दाखवण्यात आले. स्थानिक माध्यमांनी असेही वृत्त दिले की मशिदीच्या आत लोकांना कुलूपबंद करण्यात आल्याने हल्ल्यावेळी त्यांना पळून जाणे कठीण झाले.
पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, वारसाहक्क आणि मालमत्तेच्या वाटणीवरून मतभेद झाले होते. फसवणूक केल्याचा आरोप ज्यांच्यावर करण्यात आला होता, त्यांनीच हा हल्ला घडवून आणला.