मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य आणि केंद्रातील सत्ताधा-यांवर जोरदार टीका करत असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी काही बोलणार नाही. कारण तो माणूस बोलण्याच्या पातळीचाच नाही. ते कठपुतळी आहेत आणि मी कटपुतळ्यांचा खेळ बघतो, पण त्यावर बोलत नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीतून नुकताच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. फडणवीस यांनी म्हटले होते की दिशा सालियान प्रकरणात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसआटीची स्थापना करण्यात आली. त्याची चौकशी सुरु आहे. जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. मी कोणाला घाबरत नव्हतो. पण त्यावेळी मी कधी याबाबत भूमिका घेतली नाही. त्यांचा अहंकार हा एवढा मोठा आहे की, त्यांच्यासमोर काहीही करा तरी तुम्ही शून्यच असता. दुखावलो गेल्याचा प्रश्नच नाही. जेव्हा तुम्ही कुणासाठी जगातल्या सगळ्या गोष्टी करता त्यानंतर ती व्यक्ती अशा पातळीवर जाते जिथे तु्म्हाला, तुमच्या कुटुंबाला टार्गेट केल्याचा प्रयत्न केला जातो.
मी काचेच्या घरात राहत नाही आणि त्यामुळेच कोणीही माझे काही बिघडवू शकत नाही. अडीच वर्षात यांनी माझ्या केसापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टींची चौकशी केली. सुपारी देऊन मुंबईत एक पोलिस आयुक्त माझ्या चौकशीसाठी बसवले. त्यांचा जो चेहरा दिसतो आणि जो आहे त्याच्यात खूप फरक आहे. त्यांचे दोन चेहरे आहेत. समोर नसलेल्या चेह-यामध्ये अहंकार भरला आहे अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य केले होते.