बिजींग : वृत्तसंस्था
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. कुटूंबातील सगळे लोक सोबत राहत होते आणि सुख-दु:खात एकमेकांना साथ देत होते. मुलं आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यामुळे एकटेपणा, चिंता किंवा डिप्रेशनसारख्या समस्याही नव्हत्या. आजकाल लोकांना एकटेपणा जाणवत आहे. ते मनाला आणि डोक्याला शांतता मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.
याच कारणाने काही लोक आता पाळीव प्राण्यांना सोडून दगड पाळू लागले आहेत. विश्वास बसणार नाही पण दक्षिण कोरियामध्ये असाच ट्रेंड सध्या सुरू आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियामध्ये लोक एकटेपणाचे इतके शिकार झाले आहेत की, मन शांत करण्यासाठी ते हे अजब काम करत आहेत. इथे तरूणांमध्ये पेट्स म्हणून दगड पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यांचा वेगळा बेड बनवला जातो. त्यांचे वेगळे कपडे शिवले जात आहेत आणि त्यांना जिवंत प्राण्यांसारखे वागवले जाते. इतकंच नाही तर त्यांची मसाजही केली जाते.
दगडांचे फेशिअल : जे कुणी असे पेट्स स्टोन ठेवत आहेत ते त्यांना मुलगा किंवा मुलगी मानतात. त्यांच्यासाठी टॉवेल, अंथरूण आणि फेशिअल किटही घेतात. हे लोक सांगतात की, दगड डिमांडिंग नसतात ना त्यांना काही खाऊ घालण्याची गरज असते ना कुठे फिरायला नेण्याची गरज असते. यांची किंमत बाजारात ६०० रूपये ते १००० रूपये असते.
ब-याच लोकांना घरात मांजरी किंवा कुत्रे पाळण्याची आवड असते. लोक या पाळीव प्राण्यांचा आपल्या लेकरांसारखा सांभाळ करतात. त्यांना खूप जपतात. आजही बरेच लोक वेगवेगळे प्राणी पाळतात. आता त्याचप्रमाणे लोक दगड पाळू लागले आहेत.