नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाही ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. विरोधकांनी या मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका देखील केली आहे. याच मुद्यावरून मोदी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. मी पत्रकारांशी बोलत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी कोणाला बोलणं टाळलं नाही, असं मोदी म्हणाले.
आपल्या मीडियामध्ये असं कल्चर झालंय की, काहीही करु नका. फक्त माध्यमात चर्चेत रहा. मला त्या मार्गाकडे जायचं नाही. मला कष्ट करायचे आहेत. मला गरिबांच्या घरापर्यंत जायचं आहे. मी विज्ञान भवनच्या लालफीती कापून फोटो काढू शकतो. पण, मी एका छोट्या योजनेसाठी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जाऊन काम करतो. मी एका नव्या वर्क कल्चरला आणू पाहात आहे. मिडियाला हे नवं वर्क कल्चर चांगलं वाटत असेल तर त्यांनी ते दाखवावं. त्यांना तसं वाटलं नाही तर त्यांनी दाखवू नये, असं मोदी म्हणाले.
मी संसदेला उत्तरदायी आहे. महत्त्वाचं म्हणजे मिडिया आता पहिल्यासारखा राहिला नाही. मी आधी बोलायचो. पण, आता माध्यमांना माहिती असतं की मी कोणाशी बोलत आहे. पत्रकार कोणाच्या फेवरमध्ये आहे ते लोकांना माहिती असतं. त्यामुळे तो त्याच पद्धतीने बोलेल असं लोकांना वाटत असतं, असं ते म्हणाले.
मिडिया आज एक वेगळी एनटीटी राहिली नाही. अनेकांप्रमाणे लोकांना तुमचे विचार कळाले आहेत. अगोदर मिडिया बिनचेह-याचा होता. त्याला कोणताच चेहरा नव्हता. मीडियामध्ये कोण लिहितं? लिहिणा-याचे विचार कोणते? याबाबत कोणाला काही देणं-घेणं नव्हतं. पण, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही, असं मोदी म्हणाले.
आधी संवाद साधण्याचा एकच मार्ग होता. पण, आता अनेक मार्ग आहेत. आधी तुम्हाला मीडियाची गरज लागायची, पण आता जनता देखील मीडियाशिवाय आपला आवाज समोर आणू शकते. मिडिया शिवाय कोणीही व्यक्ती उत्तर देऊ शकतो, असं मोदी म्हणाले.