मुंबई : मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो अमान्य केला, असे असले तरी विधानसभेला त्यांच्याशी युती होऊ शकते असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. येत्या काळात शिंदेंच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेचे प्रमुखपद हे राज ठाकरे यांच्याकडेही जाऊ शकेल असे मला वाटते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी तोंडी परीक्षा या कार्यक्रमात हे वक्तव्य केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगेंसोबत लोकसभेला वंचितची युती झाली नसली, तरी विधानसभेला होऊ शकते. मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली. त्यामुळे जरांगे बॅकफूटवर गेले आणि प्रत्येक मतदारंसघात अशी मारामारी होईल अशी शक्यता त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी निरोप पाठवला की आता मी थांबतोय. आपण पुन्हा विधानसभेला बघू. त्यामुळे विधानसभेला त्यांच्यासोबत युती होऊ शकते.
मला कुठेतरी जाणवायला लागले आहे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा, राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुखपद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार असे काहीसे मला जाणवायला लागले आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करुन आपण शिवसेनेचे अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितले असले तरी त्याचा अर्थ होय असाच आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.