मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील शेवटच्या १३ मतदारसंघात निवडणूक होत असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर विजयाचा झेंडा रोवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीने सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा शिवाजी पार्क मैदानावर होत असून, या शेवटच्या मोठ्या सभेसाठी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे तर दुसरीकडे बांद्रा-कुर्ला मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शरद पवार व उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवणा-या भाजपाची या निवडणुकीत राज्यात दमछाक झाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबतीला असूनही बालेकिल्ल्यासह सर्वच जागांवर अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. शेवटच्या टप्प्यात मुंबई-ठाण्यातील १० जागांसह १३ जागांची निवडणूक होत असून, भाजपाने आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. नाशिक, कल्याणच्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत रोड शो केला. शुक्रवारी ते पुन्हा मुंबईत येत असून, त्यांची व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा मुंबईत होणार आहे.
शिवाजी पार्क मैदानावर होणा-या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित असणार आहेत. महायुतीची ही सभा म्हणजे एक प्रकारे प्रचाराचा ग्रँड फिनालेच असणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे प्रथमच राजकीय व्यासपीठावर एकत्र असणार आहेत. त्यामुळे या सभेत दोघे काय बोलणार, महाविकास आघाडीवर या दोन तोफा कशा धडाडणार याचे औत्सुक्य आहे. या सभेच्या माध्यमातून महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही सभा सुरू होणार आहे.
अजित पवार येणार!
बारामतीच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गायब आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनाही ते उपस्थित नव्हते. मोदींच्या मुंबईतील रोड शोला ही अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांच्या पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र शुक्रवारपासून ते पुन्हा प्रचारात उतरतील, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट केले आहे.