नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून मद्य, पैसा वाटला जाण्याची शक्यता आहे. त्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, तसेच सोशल मीडियावर व्हायरला होणारे घातक मेसेज त्वरीत थांबवून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने या दोन्ही मतदारसंघांची आढावा बैठक एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांसह विधानसभेचे निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
एस. चोक्कलिंगम म्हणाले, की कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, आशासंविका यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी पाऊस आला, तर पर्यायी नियोजन तयार ठेवा. तसेच मतदारयादीत नाव न सापडण्याच्या तक्रारींचे निराकरण तत्काळ करावे. त्याच ठिकाणी मतदारयादीत नावाच्या समावेशाबाबतचा अर्ज भरून घ्यावा, जेणेकरून विधानसभा निवडणुकीवेळी असे प्रकार रोखले जातील. तसेच ‘ईव्हीएम’संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर प्रतिबंधित वस्तू जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटांच्या आत निराकरण करावे.
मतदानासंबंधी सर्व अहवाल अचूक व वेळेत सादर करावेत. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, मेडिकल इमर्जन्सी आल्यास वैद्यकीय अधिका-यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलिस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.