कागल : कागल येथील बंधा-याजवळ वेदगंगा नदीत (शुक्रवार) दुपारी चारजण बुडाले होते. यातील तीन मृतदेह लागलीच सापडले होते, मात्र हर्ष दिलीप येळमल्ले (रा. अथणी) या १७ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला नव्हता. त्याचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान रेस्क्यू टीमला घटना घडलेल्या ठिकाणीच आढळून आला. त्यामुळे या घटनेत बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह २४ तासांच्या आत सापडले आहेत.
वेदगंगा काठावरील आणूर गावची यात्रा (म्हाई) ही बुधवारी झाली. यासाठी हे सर्व नातेवाईक गुरुदेव लोकरे यांच्याकडे आले होते. शुक्रवारी दुपारी हे सर्व नातेवाईक मिळून धुणे धुण्यासाठी व आंघोळीसाठी बस्तवडे बंधा-याच्या पूर्वेला आले होते व त्याच ठिकाणी एकमेकांचे नातेवाईक असणारे दोन पुरुष व दोन स्त्रिया बुडाल्या होत्या. यामध्ये जितेंद्र विलास लोकरे (रा. मुरगुड, वय : ३६), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (रा. अथणी, वय : ३४), हर्ष दिलीप येळमल्ले (रा. अथणी, १७ वर्षे), सौ.सविता अमर कांबळे (रा. रुकडी, वय २७) यांचा समावेश होता.
यातील हर्ष वगळता अन्य तीन मृतदेह लगेच सापडले होते. यामध्ये बहीण – भावाचा समावेश आहे. हर्षचा शोध सुरू झाला. रेस्क्यू टीम आली, पण अंधार पडू लागल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली. हीच मोहीम पुन्हा आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली. त्यानंतर अर्ध्या तासातच हर्षचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, तिथेच जवळ हा मृतदेह आढळून आला.