नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आले असून, मोदी सरकारने देशात विश्वासघाताचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मोदींनी घटनात्मक संस्थेचा गैरवापर करून ब्लॅकमेल करून आणि धमकी देऊन विविध राज्यांतील विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात पहायला मिळाला. तर महाराष्ट्राशिवाय मोदींनी कर्नाटकमध्ये, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात देखील तोच प्रकार केला, असा गंभीर आरोपही खरगे यांनी केला.
लोकसभा निडवणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. त्यापूर्वी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह महायुतीचा चांगलाच समाचार घेतला. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला. इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधक फोडल्याचा दावा केला. यावेळी इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
खरगेंनी निवडणूक आयोगावर व्यक्त केला संशय
देशात सध्या मूळ पक्ष चोरण्याचे काम सुरू असून, भाजपला पाठिंबा देणा-या लोकांना मूळ पक्षाचे नाव, चिन्ह देण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे खरगे यांनी निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेवरही संशय व्यक्त केला. या सर्व गोष्टी पंतप्रधान मोदींच्या इशा-यावर होत असल्याचा आरोप खरगे यांनी केला. देशाच्या इतिहासात कोणत्याच पंतप्रधानांनी तोडफोडीचे राजकारण केले नाही, असा दावाही खरगे यांनी केला.