नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाचव्या फेरीचा निवडणूक प्रचार आज थंडावणार आहे. २० मे रोजी होणा-या मतदानादरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचव्या फेरीत ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील सात आणि बिहार आणि ओडिशातील प्रत्येकी पाच जागांचा समावेश आहे. याशिवाय या टप्प्यात झारखंडच्या तीन, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी एका जागेवरही मतदान होणार आहे.
पाचव्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या ठिकाणी २०१९ मध्ये एकूण ६२.०१ टक्के मतदान झाले होते. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१३ टक्के मतदान झाले होते, तर सर्वाधिक कमी ३४.०६ टक्के मतदान जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले होते. पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होताच देशातील ५४३ लोकसभेच्या जागांपैकी ४२८ जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. पाचव्या टप्प्यातील ४९ जागांसाठी एकूण ६९५ उमेदवार रिंगणात आहेत.
कोणत्या राज्यात किती जागांवर होणार मतदान?
राज्य जागा उमेदवार
उत्तर प्रदेश १४ १४४
महाराष्ट्र १३ २६४
पश्चिम बंगाल ७ ८८
बिहार ५ ८०
ओडिशा ५ ४०
झारखंड ३ ५४
जम्मू-काश्मीर १ २२
लडाख १ ३
एकूण ४९ ६९५