28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeधाराशिवचार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने जम्बो कार्यकारिणीमुळे सभा हाऊसफुल्ल

चार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने जम्बो कार्यकारिणीमुळे सभा हाऊसफुल्ल

महायुती, महाविकास आघाडीला सभेसाठी माणसं जमविणे गेले सोपे - वंचितसह अपक्षांची मात्र बेजारी

मच्छिंद्र कदम

धाराशिव : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांचे विभाजन होऊन दोन पक्षांचे चार पक्ष झाले. त्यात महाविकास आघाडीकडे व महायुतीकडे प्रत्येकी दोन पक्षांची वाढ झाली. त्यामुळे या पक्षांची शहरी भागासह ग्रामीण भागात झालेली जम्बो कार्यकारिणी यामुळे महायुतीला भाजपा-शिवसेनेस राष्ट्रवादीच्या एका गटाच्या कार्यकर्त्यांचे बळ मिळाले. तशीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्येसुध्दा झाली. काँग्रेससह राष्ट्रवादी महाविकास आघाडीला शिवसेनेच्या एका गटाच्या कार्यकर्त्यांचे बळ मिळाले. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारास सभेसाठी तीन-तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बळ मिळाल्याने सभेसाठी माणसं मिळविणे सोपे गेले.

त्यामुळेच वाडी, वस्ती, तांड्यावरच्या सभेस हाऊसफुल्ल गर्दी झाल्याचे दिसून आले. याउलट वंचित व इतर अपक्ष उमेदवारांना मात्र सभेसाठी गर्दी करताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले.
१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीतील मतदान प्रक्रिया २० मे रोजी होत आहे. तर चार टप्प्यांतील रणधुमाळी आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली होती. एकीकडे उन्हाचा पारा सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीचा आखाडा पेटला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, विश्व शक्ती पार्टी आदी पक्षांसह अपक्ष असे ३१ उमेदवार रिंगणात होते. ७ मे रोजी त्यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे.

मात्र या लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वरिष्ठ नेत्यांच्या सभा पाहिल्या तर त्यांच्या सभेसाठी एकापेक्षा एक गर्दी झाल्याचे दिसून आले. महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेस मोठी गर्दी होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सभा झाली. या सभेसाठीही मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. याशिवाय महायुतीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार, नितीन बानगुडे-पाटील, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख आदींच्या सभा झाल्या. या प्रत्येकांच्या सभेस प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. अर्थात त्यासाठी त्या-त्या उमेदवारांकडून नियोजनही करण्यात आले होते. मात्र हे नियोजन करत असताना महायुतीला भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार तर महाविकास आघाडीला काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी शरद पवार या तीन-तीन पक्षांच्या जम्बो कार्यकारिणी असलेल्या कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे.

महायुती व महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्ष असलेल्या कार्यकर्त्यांची आज शहरी भागासह ग्रामीण भागात जिल्हा कार्यकारिणी, जिल्हा युवक कार्यकारिणी, विविध सेल, शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कल प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख अशी जम्बो कार्यकारिणी प्रचारात सक्रिय असल्याची दिसून आली. त्याउलट कार्यकर्त्यांच्या अभावामुळे वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्ष उमेदवारांच्या सभा या मतदारसंघात झाल्याच्या दिसून आल्या नाहीत. धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवारासाठी झालेल्या प्रचारसभेच्या प्रचंड गर्दीमुळे विजयी कोण होणार हे सांगणे कठीण आहे. सभेसाठी प्रचंड गर्दी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदारांनी नेमका मतदानाचा कौल कोणाला दिला. हे येत्या ४ जूनला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील, वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह ३१ उमेदवारांच्या भवितव्याकडे आता मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR