उरण : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिका-यांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.
कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्यानंतर महिना-दीड महिना आधी मतदारयाद्या प्रसिद्ध होत असतात. त्या मतदारयाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी घेऊन नावांची तपासणी करतात. मग उरण विधानसभा मतदारसंघातील उरणमधील काँगेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, उरण शहर उपाध्यक्ष गुफारण तुंगेकर यांच्यासह जवळपास १५० ते २०० मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याचे उघड झाल्याने ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. हे काँग्रेसचे मतदार असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे पाटील यांना बसणार असल्याची चर्चा आहे.
मतदारयादीत नावे नसल्याची माहिती पदाधिका-यांना आधी कशी समजली नाही. मग हे पदाधिकारी काय कामाचे अशी चर्चा उरण परिसरात सुरू आहे. पदाधिका-यांची नावे मतदारयादीत नसतानाही हे पदाधिकारी मतदानाच्या दिवशी मतदान बुथवर नेत्यांच्या बरोबर भेटी देण्यात मग्न होते. त्यापेक्षा त्यांनी आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा यासाठी काहीच प्रयत्न करताना दिसत नव्हते. याचा अर्थ त्यांना मतदानाचे महत्त्व वाटत नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.