28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरउजनीत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले

उजनीत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले

एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

सोलापूर : उजनी धरणात करमाळ्यातील कुगाव आणि इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावादरम्यान बोट उलटून बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सुमारे ३६ तासांनी सापडले. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांसह करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या ६ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. एनडीआरएफचे पथक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे शोध कार्य पार पडले.

करमाळ्यातील कुगाव येथून बोटीत बोटचालकासह सात जण मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे निघाले होते. मात्र, जोरदार वारा आणि उजनी धरणातील लाटांमुळे बोट बुडाली. मात्र, बोटीतील पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहून कळाशी काठ गाठला आणि स्वत:चा जीव वाचवला. मात्र इतर सहाजण हे धरणात बुडाले होते.

ही घटना समजल्यानंतर काही नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी बुधवारी दिवसभर शोध मोहीम राबवली. पण, बुडालेल्या सहा जणांचा शोध लागला नाही. अखेर आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास या सहा जणांचे मृतदेह हाती लागले.

गोकुळ जाधव, कोमल जाधव या पती-पत्नीसह तीन वर्षांची मुलगी वैभवी (माही), दीड वर्षाचा मुलगा शुभम जाधव (सर्व रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), तर आदिनाथ सहकारी साखर काखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव डोंगरे आणि बोटचालक अनुराग अवघडे (दोघेही रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या सहाही जणांचे मृतदेह आज सकाळी हाती लागले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी आमदार नारायण पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, मकाई कारखान्याचे संचालक पिसाळ, भाजपचे गणेश चिवटे, नानासाहेब लोकरे, तानाजी झोळ, दत्तात्रय सरडे, चंद्रकांत सरडे यांनी शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR