मुंबई : राज्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. २४ मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पत्रकार परिषद घेत शेतक-यांच्या वतीने सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या असून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पवारांनी सांगीतला सरकारला फार्म्यूला सांगीतला आहे.
राज्यातील दुष्काळाच्या स्थितीची माहिती देताना शरद पवार म्हणाले की महाराष्ट्रात सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. आपल्याकडे देशात सर्वाधिक धरणे आहेत. मात्र संभाजीनगर येथील धरणात १० टक्के पाणी आहे, पुणे विभागातील धरणांमध्ये १६ टक्के पाणी आहे, नाशिक विभागातील धरणांमध्ये २२ टक्के आणि कोकणातील धरणांमध्ये २९ टक्के पाणी आहे. महाराष्ट्रात जी मोठी धरणे आहेत, त्यामध्ये उजणी धरणात सध्या उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५.५० इतका जलसाठा आणि मांजरा धरणात ०.३४ टक्के आणि धाराशिव जिल्ह्यातील धरणांमध्येही शून्य टक्के पाणीसाठी आहे. नगर जिल्ह्यातील तिन्ही मोठ्या धरणांमध्ये ९ टक्के पाणीसाठी आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
कोणत्या आहेत मागण्या?
१. संभाजीनगर विभागात १५६१ गावांमध्ये पाण्याची मागणी आहे आणि या विभागात १८३७ इतके टँकर सध्या आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर तेथील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथं आवश्यकता आहेत तिथे टँकर सुरू करावेत.
२. शेतक-यांनी विमा काढलेला आहे, मात्र विमा कंपन्या हे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत.
३. वीज बिलात सूट द्यावी. वीज बील वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही स्थितीत बिल भरले नाही म्हणून शेतक-यांची वीज खंडित करू नये.
४. मनरेगाच्या कामात जे निकष आहेत ते शिथिल करावेत आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजनेचे जे निकष राज्य सरकारने आणले होते त्याची अंमलबजावणी करावी.
५. जिथे जास्त दुष्काळ आहे, पिके गेली आहेत, त्या भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे.
६. फळबागांचे नुकसान झाल्यानंतर अनुदान देण्याची पद्धत होती. ते अनुदान राज्य सरकारने आता देण्याची गरज आहे.
७. ज्या ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर आहे, तिथे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.