पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी दौरे करत ते जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना एका प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून, वॉरंट रद्द करण्यात आले आहे. परंतु, यावेळी न्यायालयाने मनोज जरांगेंना दंडही ठोठावला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केले आहे.
वॉरंट रद्द करताना न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एक जामीनदार द्यायला सांगितला आहे. सन २०१३ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोज जरांगेंविरोधात वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे न्यायालयासमोर हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली होती.