वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा ६० धावांनी दारुण पराभव केला. नजमुल हसन शंतोच्या नेतृत्वातील बांगलादेशला सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत यांनी फलंदाजीत अमुलाग्र योगदान दिले तर गोलंदाजीत शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांनी जलवा दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर १८३ धावांचे आव्हान दिले. मात्र, बांगलादेशला निर्धारित षटकांत १२२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर सौम्या सरकार एकही धाव न काढता बाद झाला. बांगलादेशचे आघाडीचे तीन फलंदाज १० धावांतच तंबूत परतले होते तर ३९ धावांवर बांगलादेशला चौथा धक्का बसला. बांगलादेशच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या ४२ धावांत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र यानंतर शाकीब अल हसन आणि महमुदुल्लाह यांनी डाव सावरला. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली. महमुदुल्लाहने २८ चेंडूत ४० धावा केल्या तर शाकीब अल हसनने ३४ चेंडूत २८ धावा केल्या, पण बांगलादेशला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. बांगलादेशला ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशच्या सौम्या सरकार, तनजीद हसन लिटन दास, नजमुल हसन शांतौ आणि तौहीद हृदय या फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.