पुणे : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली, पण बारामती ही शरद पवारांची आहे हे सिद्ध झाले आहे. राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे असते, त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत आणि आमचे कुटुंबप्रमुख शरद पवारच आहेत, अशी भूमिका श्रीनिवास पवार यांनी मांडली. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते बारामतीकडे. या मतदारसंघात पवार वि. पवार असा सामना रंगला. सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी लढाई असली तर खरी लढाई ही अजित पवार वि. शरद पवार अशीच असल्याचे चित्र दिसत होते. संपूर्ण पवार कुटुंबाचा पाठिंबा हा सुप्रिया सुळे यांना होता. तर सहानुभूती मिळवत आपल्याला एकटं पाडण्यात आल्याचा दावा अजित पवार यांनी केला.
अखेर या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला या संपूर्ण निवडणुकीत पवार कुटुंबाच्या बाजूने बोलणारे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी या निकालानंतर पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. बारामती ही शरद पवार यांचीच हे सिद्ध झाले असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले.