28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली

फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या मोठ्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. २८ जागांवर निवडणूक लढणा-या भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळालं. पत्रकार परिषदेत आम्ही कमी पडलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच पक्षनेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळे नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते योग्यच केले असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला त्याची कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली. कारण दिल्लीच्या नेतृत्वासमोर त्यांनी ४५ पेक्षा अधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीसांनी जो आकडा दिला तो गृहीत धरून मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्यानंतर मोदी तोंडघशी पडले. कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभेसाठी हा प्रयत्न आहे. पण त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही हे पाहावे लागेल. सकृतदर्शनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या नेतृत्वाची दिशाभूल केली त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. त्यामुळे भाजपचा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी टच संपलेला आहे. त्यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आणि त्याला मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला. काहीतरी चुकल्याची त्यांना जाणीव झाली हे बरं झालं, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR