25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारमधून मोकळे करा

सरकारमधून मोकळे करा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
मुंबई : प्रतिनिधी
आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे. त्यामुळे सरकारमधून मोकळे करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वत: लक्ष घातले. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारतो. सरकारमधून बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आणि दुसरीकडे महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. २०१९ च्या निवडणुकीत २३ जागांवर यश मिळविणा-या भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळवता आला.

राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. राज्यात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही, त्याचा फटका बसला, असे फडणवीस म्हणाले. आघाडी, महायुतीला समसमान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला. त्यात महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के तर महायुतीला ४३.६० टक्के मते मिळाली. मुंबईत आम्हाला आघाडीपेक्षा २ लाख अधिक मते मिळाली. त्यामुळे कुठेही भाजपला नाकारले नाही, असेही ते म्हणाले.

देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडित नेहरू यांच्यानंतर पुन्हा एकदा तिस-यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद जनतेने मोदींना दिला. एनडीएचे सरकार देशात येते. १९६२ नंतर पहिल्यांदाच तिस-यांदा सरकार होत आहे. ओदिशामध्ये भाजपचे प्रथमच सरकार होत आहे. आंध्र प्रदेशात चंद्रबाबूंच्या नेतृत्वात पसंती दिली. अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, असेही ते म्हणाले .

नेत्यांची सागर बंगल्यावर धाव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची विविध कारणे सांगताना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री विखे पाटील तसेच प्रसाद लाड आदी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी सरकारबाहेर जाऊ नये, यावर एकमत झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR