मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मातीतील काका-पुतण्या जोडीत रंगलेला सामना काकांच्या पारड्यात पडला. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये रंगलेल्या द्वंद्वामध्ये बारामतीत शरद पवारांचा विजय झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मतांनी दादा गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पराभूत केले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राज्यासह देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तशातच सातासमुद्रापार अमेरिकेतही त्यांच्या विजयाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले. त्याचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुळे यांच्या विजयानंतर न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’वर त्यांचे अभिनंदन करणारे मोठे बॅनर लावण्यात आले. बॅनरचा व्हीडीओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
तो पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलवर रीपोस्ट करण्यात आला आहे. त्याला मराठी कॅप्शन दिले आहे. ‘साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये झळकले सुप्रियाताई सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर, ताईंचे चाहते परीक्षित तळोकर यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत,’ असे कॅप्शन त्या व्हीडीओला देण्यात आले आहे.