नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव या दोघांनीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता हे दोघेही चांगल्याच धर्मसंकटात अडकले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही जागांवरून राहुल गांधींनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर सपा प्रमुख अखिलेश यादव करहर मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांसमोर कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे याचे कोडे पडले आहे.
राहुल यांनी वायनाडमधून ३.९० लाख मतांच्या फरकाने आणि रायबरेलीमधून ३.६४ लाख मतांनी निवडणूक जिंकली. या दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी राहुल गांधींना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. यामुळे राहुल वायनाड मतदारसंघ सोडायचा की रायबरेली या कोंडीत अडकले आहेत.
दरम्यान रायबरेली गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असून राहुल गांधी रायबरेलीचे प्रतिनिधित्व कायम ठेवू शकतात, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातून १.७० लाख मतांनी दणदणीत विजय संपादित केला आहे. यामुळे आमदारकीवर कायम राहायचे की खासदारकीची शपथ घ्यायची असा पेच अखिलेश यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, अखिलेश करहाल विधानसभेचा राजीनामा देऊ शकतात असे बोलले जात आहे. दोन्ही नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.