सांगोला : पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून डॉक्टर पत्नीने घरात डायनिंग हॉलमधील पंखाल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगोल्यात फॅबटेक कॉलेज वसाहतीत घडली. या घटनेने सांगोल्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
डॉ. ऋचा सूरज रूपनर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले, सासू-सासरे असा परिवार आहे. याबाबत, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी डॉ. ऋचा रूपनर अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सांगोला येथील डॉ. सूरज रुपनर यांची पत्नी डॉ. ऋचा रुपनर यांच्यात कौटुंबिक वाद होत होता, अशी माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. त्यातूनच डॉ. ऋचा यांनी सांगोला येथील फॅबटेक कॉलेज येथील राहत्या घरामध्ये डायनिंग हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेतला. ही घटना डॉ. ऋचा यांच्या सासूने पाहून आरडाओरडा केला.
यावेळी पती डॉ. सूरज यांनी पत्नी ऋचा हिला खाली उतरवून तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डॉ. ऋचा रूपनर यांच्या पंढरपूर येथील नातेवाइकांनी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यापुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.
भाऊ डॉ. ऋषिकेश पाटील यांनी बहीण ऋचा हिच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करून तिचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर शवविच्छेदन करावे, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे सांगोला पोलिसांकडे केली. त्यानुसार सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप व तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर तिचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.