सोलापूर : शासनाच्या कोणत्याही विभागाची आणि सोलापूर महानगरपालिकेची परवानगी आणि नाहरकत दाखला न घेता बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून इमारती बांधल्या आणि “वन शहीद” स्मारक बांधून शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. बसवराज बगले यांनी केली.
मजरेवाडी महसूल हद्दीतील नेहरू नगर येथील सर्व्हे नंबर ५९१ ते ५९४ या वन जमिनी महसूल खात्याने १९९५ साली काही अटी व शर्तीस अनुसरून वन विभागाकडे वनसंवर्धनासाठी वर्ग केल्या आहेत. त्या जमीनीवर फक्त वनीकरण करणे बंधनकारक असताना उपवन संरक्षक पाटील यांनी झाडांची कत्तल केली. शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करून बनावट कागदावरुन निधी मिळविला. वन जमीनीचा निर्वनिकरणाचा आदेश नसताना बेकायदेशीरपणे अनेक इमारती बांधल्या. त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रूपयांचा चुराडा झाला आहे.
वन विभागाकडून शर्तभंग झाल्याने सदरच्या वन जमीनी महसूल खात्याने त्वरीत ताब्यात घ्याव्यात, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलीय.प्रत्यक्षात वन विभागाच्या मालकीची जमीन असल्याचाकोणताही पुरावा नसताना हुकुमशाही पध्दतीने सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नागरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेचे नियम डावलून बांधलेले बेकायदेशीर ” वन शहीद”स्मारक आणि संरक्षक भिंतींचे अतिक्रमण तात्काळ हटवावे. तसेच १९८४ साली सरकारने बांधून महानगरपालिकेकडे वर्ग केलेल्या समाजमंदिरात घुसखोरी करून त्याचे वनभवन नामकरण केलेल्या इमारतीत वन खात्याचे कार्यालय थाटले आहे. त्या कार्यालयाची हकालपट्टी करावी, अशीही मागणी डॉ. बगले यांनी महापालिकेचे आयुक्त शीतल उगले यांच्याकडे केली आहे.
वन विभागाच्या जागेत शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या काशी विश्वेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी व पूजेसाठी हजारो भक्त जात असतात. या लिंगाकडे जाणारा मार्ग बंद करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वन कार्यालयासमोरील अनेक कडुलिंबाच्या झाडांची विनापरवाना कत्तल करून त्याठिकाणी बांधकाम केले आहे. कुंपणानेच शेत खाल्ले” असा प्रकार घडल्याने वन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
या सर्व नियमबा आणि बेकायदेशीर कृत्याबद्दल व बनावट कागदावरुन दिशाभूल करून शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांच्याकडून दंडात्मक वसूली करावी. अन्यथा लोकायुक्त आणि उच्च न्यायालयात दाद मागून कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याविरूध्द दाद मागण्यात येईल, असा इशारा डॉ. बसवराज बगले आणि सुरेश स्वामी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.