लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र मधुकर किसनराव सातपुते यांनी पोलीस खात्यातील विविध पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल २०२०-२१ वर्षातील जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक नुकतेच मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सातपुते यांना प्रदान करण्यात आले.
मधुकर सातपुते यांची नोकरीची सुरुवात राज्य राखीव पोलीस दलात पोलीस आमदार म्हणून झाली होते. अतिशय मेहनतीने जिद्दीने व प्रामाणिकपणाने त्यांनी वरिष्ठ परीक्षा उत्तीर्ण होवून फौजदार, उपाधीक्षक पदावर नोकरी करत करत पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल गाठली.सध्या ते सेवानिवृत्त असले तरी नक्षलवादी विभागात फौजदार, उपाधीक्षक, नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपसंचालक तर कधी पोलीस अधीक्षकाच्या पदोन्नतीनंतर छत्रपती संभाजीनगरातील भारतीय राखीव बलामध्ये समादेशक पदावर कार्य केले. जालना, पुणे येथेही त्यांनी नोकरी केली. जिथे जिथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली तिथे तिथे त्या संधीचे सोने करत त्यांनी नावलौकिक मिळवला.
यावेळी त्यांनी अनेक उपक्रम नोकरीच्या काळात या पोलीस दलात राबवले. भारतीय राखीव दलात लोकवाट्यातून पेट्रोलपंप, मंगल कार्यालय, पोलीस दलातील कर्मचा-यांच्या पाल्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या सन्मान बद्दल थोरले बंधू कवी भारत सातपुते यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.