मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी हे तिस-यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडेल. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारमधील काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता आहे. यापैकी पहिल्या खासदाराचे नाव निश्चित झाले झाले. अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. उद्या राष्ट्रपती भवनात होणा-या सोहळ्यात प्रफुल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आता त्यांना कोणते खाते देण्यात येणार, हे पाहावे लागेल. यापूर्वी प्रफुल पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रत्येक चार खासदारांमागे एक मंत्रिपद असे सूत्र निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजप महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवू शकते. भाजपकडे अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय ही खाती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित खात्यांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला कोणते खाते येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी, रेल्वे, पंचायत राज या खात्यांपैकी एखादे खाते महाराष्ट्राच्या वाट्याला येणार का, हे पाहावे लागेल. येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे कोणते खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार, हेदेखील पाहावे लागेल.