लातूर : ‘पंकजाताई निवडून नाही आल्या तर सचिन गेला…’ असा व्हीडीओ व्हायरल करणा-या ट्रकचालक सचिन मुंडे (३८, रा. येस्तार, ता. अहमदपूर) यांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आल्याची घटना अहमदपूर-अंधोरी रोडवरील बोरगाव पाटीनजीक घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील शेतकरी कुटुंबातील अविवाहित युवक सचिन कोंडीबा मुंडे हा व्यवसायाने ट्रकचालक होता. ट्रकचालक असलेला सचिन आई-वडील आणि भावाचा उदरनिर्वाह चालवीत होता. त्याने काही दिवसांपूर्वी ‘पंकजाताई नाही जर आल्या… तर सचिन गेला…’ असा व्हीडीओ व्हायरल केला होता. दरम्यान, त्याचा मृतदेह बोरगाव पाटीनजीक शुक्रवारी रात्री आढळून आला आहे. पोलिस म्हणतात, चालकाने बोरगाव पाटीवर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी अहमदपूर आगाराची यलदरवाडी मुक्कामी बस (एमएच १३ सीयू ७९२९) शुक्रवारी रात्री नऊ वाजता थांबवली होती.
दरम्यान, चालकाने प्रवासी चढल्यानंतर बस पाठीमागे घेतली असता, पाठीमागे थांबलेल्या सचिनला बसचा जोराचा धक्का लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या मृतदेहावर येस्तार येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात मृत सचिनचे काका संग्राम वैजनाथ मुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून बसचालकाविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.उपनि. रामचंद्र गोखरे हे करीत आहेत.
‘पंकजाताई नाही जर आल्या… तर सचिन गेला…’ असा सचिन मुंडे यांचा व्हीडीओ अहमदपूर तालुक्यातील सर्व व्हॉटस अॅप ग्रुप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगानेही पोलिस अधिक तपास करत आहेत.