16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूर२२ प्रकल्प कोरडे तर ७४ जोत्याखाली

२२ प्रकल्प कोरडे तर ७४ जोत्याखाली

लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठ-दहा दिवसांत लातूर जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाने धुमाकुळ घातला असला तरी या पावसाने जिल्ह्यातील एकाही प्रकल्पातील पाणीसाठ्यात दखलपात्र वाढ झालेली नाही. उलट पावसाळा सुरु झाला असला तरी जिल्ह्यातील २२ प्रकल्प कोरडे तर ७४ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखालीच आहे. ३४ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीपातळी आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून  प्रकल्पांतील पाणीपातळी वाढण्यासाठी सलग मोठ्या पावसांची आवश्यकता आहे.
लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे, तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम तर १३४ लघू असे एकुण १४४ प्रकल्प आहेत. या १४४ प्रकल्पांपैकी एकही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नाही.  केवळ एका लघु प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. ५१ ते ७५ टक्के पाणी २ प्रकल्पांत आहे. २५ ते ५० टक्के पाणी ११ प्रकल्पांत ५ मध्यम व २८ लघू असे एकुण ३४ प्रकल्पांत २५ टक्क्यापेक्षा खाली पणीपातळी आहे. ७४ प्रकल्प जोत्याखाली तर २२ प्रकल्प कोरेडे पडले आहेत.  लातूर शहरासह बीड व धाराशिव जिल्ह्यातील जवळपास २१ विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील  धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठा अखेर जोत्याखाली गेला आहे.
उपयुक्त पाणीसाठा शुन्यवर असून लातूर शहराला येत्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आहे ते पाणी पाऊस पडेपर्यंत काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.  लातूर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मांजरा धरणाची प्रकल्पीय क्षमता १७६.९६२ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणात सद्य:स्थितीत उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी शुन्यावर आली आहे. निम्न तेरणा धरणाची प्रकल्पीय क्षमता ९१.२२१ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणातीलही उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आहे.
आठ मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा १२२.१५५ दशलक्ष घनमीटर असून या आठ प्रकल्पांत २.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. १३४ लघू प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१४.२६६ दशलक्ष घनमीटर आहे. या लघू प्रकल्पांत सद्य:स्थितीत ६.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकुण १४४ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ७०४.६०५ दशलक्ष घनमीटर आहे. सद्य या १४४ प्रकल्पांमध्ये ३.३४ टक्के पाणीसाठा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR