जालना : आम्हीच मार खाल्ला. आमच्यावरच केसेस झाल्या. मग गैरसमज झाला असे-कसे म्हणू शकता? फडणवीस साहेब, तुम्ही भ्रमात राहू नका, मी कोण्या पक्षाचा नाही. केसेस मागे घ्या, सग्यासोय-यांची अंमलबजावणी करा, महामंडळाच्या अटी-शर्ती दूर करा, मराठ्यांचा रोष घेऊ नका. यांनी आता ताजे थोबाड फोडले, मागे त्यांनी फोडले, महाविकास आघाडी आणि महायुतीचा विषय नाही. महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डबे दिले नाहीत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते अंतरवाली सराटीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस तुम्ही आरक्षण दिले, तेव्हा मराठ्यांनी तुमचा उपकार फेडला. तुम्हाला निवडून दिले. त्यांनी आणखी गैरसमजात राहू नये. १०६ आमदार मराठा समाजाने निवडून दिले आहेत. आता तुम्ही १० टक्के आरक्षण दिले. त्यात अनेक अडचणी येत आहेत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. तुमची दीडशे किलोमीटर रॅली निघाली तरी आम्ही खपाखप पाडणार आहोत. तुम्ही जर आमचे ठरल्याप्रमाणे सगेसोयरेचे आरक्षण दिले नाही तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. गावखेड्यातील मराठा आणि ओबीसी एक आहेत. माझ्या गरिबाच्या मताला किंमत नव्हती ती मिळाली, अजून विधासभेला बघा, आम्ही ५-६ जाती कार्यक्रमच लावणार आहोत. तुम्ही चतुर असाल तर आम्ही महाचतूर आहोत, असेही म्हटले. तत्पूर्वी मराठवाड्यात लागलेल्या निकालाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मराठवाड्यात विरोधी पक्षाकडून मराठा समाजात एक नॅरेटिव्ह तयार केला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिले. सारथी संस्था, फी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, हॉस्टेल योजना या सगळ््या गोष्टी आपल्या काळात झाल्या. असे असले तरीही ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्याच पारड्यात हे मतदान गेले. पण हे नॅरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.