मुंबई : नरेंद्र मोदी हे तिस-यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यासोबत आज मोदींच्या मंत्रिमंडळात ८४ मंत्री शपथ घेणार आहेत. यावेळी एनडीएतील सदस्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. मात्र एनडीएच्या सदस्य असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या शपथविधीमध्ये मंत्रीपद मिळणार नाही. भाजपने दिलेले राज्यमंत्री पद राष्ट्रवादीने नाकारले असून आम्हाला केंद्रीय मंत्रिपद हवे असल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
तिस-यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनडीएच्या बैठकांना मला जाता आले नाही. त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पाठवले होते. एनडीएच्या सदस्य असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदींकडे जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज आम्ही शपथविधीसाठी आलो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले आहे. आम्हाला रात्री फोन करण्यात आला होता. त्याआधी आम्ही राजनाथ सिंह, अमित शाह यांच्याशी बैठक झाली होती. महाराष्ट्रातील निकालाबाबत त्यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती की संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावे. त्यांनी ठीक आहे म्हटले.
त्यानंतर त्यांचा आम्हाला मेसेज आला की एका सदस्याला संधी देण्यात येईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री असताना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. पण आम्हाला केंद्रीय मंत्रीपद हवे आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी जी ऑफर दिली होती ती आम्ही नाकारली असा खुलासा अजित पवार यांनी केला.
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर एनडीएची बैठक झाली त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे गेले होते. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांच्या म्हणण्याला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यावेळी दोघांनी सांगितले की ताबतोब एनडीएची बैठक घ्या आणि आपण नरेंद्र मोदींची निवड करु. यासाठी एनडीएच्या सदस्यांना बोलवण्यात आले. एनडीएचे घटक या नात्याने नरेंद्र मोदींनी सांगितलेले की राजनाथ सिंह, अमित शाह आणि जेपी नड्डा चर्चा करतील. त्या बैठकीत राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने त्यांना सांगितले की जरी आमची लोकसभेला एक जागा आली असली तरी राज्यसभेची एक जागा आहे.
दोन तीन महिन्यामध्ये आमच्या राज्यसभेच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात एक जागा मिळावी ही आमची विनंती होती. शनिवारी त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की मंत्री पद न देता राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार देत आहोत. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिमंडळात पाठवण्याचे ठरवले होते. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे त्यामुळे ते पद दिले तर जास्त चांगले होईल असे सांगितले. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे असल्याने अनेकांना आम्ही राज्यमंत्री करत आहोत, असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची मागणी केली नाहीतर थांबण्याची तयारी असल्याचे सांगितले. आमच्या मनात दुसरे काही नाही. आम्ही एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे असे अजित पवारांनी स्पष्ट केले.