नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिस-यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि हॅट्ट्रिक साधत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी साधली. यावेळी मोदी यांच्यासोबत ३० कॅबिनेटमंत्री, ६ स्वतंत्र पदभार आणि ३६ राज्यमंत्री अशा एकूण ७२ जणांना पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुमू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, राज्यात शिंदे गटाला प्रताप जाधव यांच्या रूपाने एक स्वतंत्र पदभाराचे राज्यमंत्रिपद मिळाले. तसेच रिपाइं नेते रामदास आठवले यांना पुन्हा लॉटरी लागली. याशिवाय रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या नव्या चेह-यांचाही समावेश करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिपदाविना समाधान मानावे लागले.
या शपथविधी सोहळ््याला कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी आणि अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथसिंग, अमित शाह, नितीन गडकरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलीे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. आता गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून विद्यमान मंत्री असलेल्या २० दिग्गजांना वगळण्यात आले असले तरी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पियूष गोयल, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, सवार्नंद सोनोवाल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भुपेंद्र यादव, गिरीराज सिंह, किरेन रिजीजू, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया यांच्यासह माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर यांनाही संधी मिळाली. यासोबतच जितनराम मांझी, एच. डी. कुमारस्वामी, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील, अन्नपूर्णा देवी, गजेंद्रसिंह शेखावत यांनाही कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नवे चेहरे पाहायला मिळाले. एनडीए सरकार असले तरी संपूर्ण मंत्रिमंडळावर भाजपचाच प्रभाव दिसून आला. तसेच भाजपने महत्त्वाची खाती मित्रपक्षांना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एनडीएत भाजपचीच चलती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही भाजपने नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्यासारख्या बड्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद देतानाच शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र पदभार दिला आहे. तसेच राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रातही ओबीसी, मराठा, एससी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
२० विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट
स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्ही. के. सिंह आणि अश्विनी चौबे, अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आर. के. सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भागवत कराड या माजी मंत्र्यांना डच्चू मिळाला.
अजित पवार गटाला वगळले
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने राज्यमंत्री स्वतंत्र पदभारची ऑफर दिली होती. परंतु प्रफुल्ल पटेल कॅबिनेटमंत्री राहिल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला पुढील काही काळासाठी धीर ठेवण्याचे सांगण्यात आल्याचे म्हटले.
मराठवाडा, कोकणला वगळले
महाराष्ट्रात प्रादेशिक समतोल साधताना विदर्भ, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुण्याला प्रतिनिधित्व मिळाले. परंतु मराठवाडा आणि कोकणातून कुणाच्याच गळ््यात मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. मराठवाड्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. परंतु कोकणात भाजपला यश मिळाले. परंतु राणेंना यावेळी वगळले. त्यामुळे समर्थकांची निराशा झाली.