मुंबई : प्रतिनिधी
अखेर मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून मुंबईत धडकला आहे. राज्यातही अनेक भागात गेल्या २ दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिलीे. मुंबईत गेल्या २ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यात आता मान्सून दाखल झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातही ब-याच भागात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रात ११ जूननंतर मान्सून व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, जून महिन्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर जुलै महिन्यात प्रशांत महासागरात ला निना परिस्थिती निर्माण होणार असल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात पुढील २४ तासांत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळतील. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वा-यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातीही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वारा आणि मध्यम पाऊस पाहायला मिळेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा जोर
मुंबईत काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील २४ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबत दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.