पुणे : प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज कोकणासह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यंत मान्सूनने अर्धा महाराष्ट्र गाठला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाची दमदार हजेरी
राज्यात १ ते १० जून दरम्यान सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील बहुतांश पाऊस पूर्वमोसमी असतो. १० ते १५ जूननंतर राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनच्या सरींना सुरुवात होते. या वर्षी मध्य महाराष्ट्र, विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये राज्यात ४४.९ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडला.
दहा दिवसांमध्ये ४४.९ मिलिमीटर पाऊस
नैऋत्य मोसमी वा-यांची (मान्सून) राज्यातील घोडदौड सोमवारीही कायम राहिली. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या उर्वरित भागात मान्सून सलामी देईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांमध्ये ४४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडल्याची माहितीही खात्यातर्फे देण्यात आल आहे. मान्सून सरासरी तारखांप्रमाणे १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. या वर्षी आतापर्यंत अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे एक ते दोन दिवस आधीच राज्यात सर्वदूर मान्सून हजेरी लावेल, असा अंदाज आहे. यंदा मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे.