मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकसंध आणि ताकदीने दिसेल, अशी चर्चा होत असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी १५ जूनला मतदान होणार होते, पण शाळांना सुटी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती.
७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली. त्यानंतर नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार आता २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
नाशिकचे उमेदवार मागे घ्या : पटोले
लोकसभेप्रमाणेच ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागा परस्पर घोषित केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोप दिला आहे. महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुंबईतून विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना उबाठाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत,असा निरोप नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाही. परस्पर त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.
कोकण आणि नाशिकसाठी काँग्रेस आग्रही
कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र लोकसभा जागा वाटपाच्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषीत केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप आहे. मुंबईची जागा काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडण्यास तयार आहे. मात्र कोकण आणि नाशिकसाठी काँग्रेस आग्रही आहेत.
निवृत्त होणारे सदस्य
मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती)
कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप)
नाशिक शिक्षक : किशोर दराडे (अपक्ष)