धाराशिव : प्रतिनिधी
राज्यात सर्वदूर मान्सूनला सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी सलग दोन दिवस कोसळणा-या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर, काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसानंतर एक अजबच चमत्कार घडला आहे. धाराशिव जिल्ह्यातून अचानक जमिनीतून निळे पाणी येऊ लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला शिवारामध्ये काल सायंकाळी रस्त्याच्या कडेला वीज पडली होती. ज्या ठिकाणी वीज पडली त्या जागेवरून जमिनीतून पाणी येऊ लागले. विशेष म्हणजे हे पाणी निळ्या रंगाचे आहे. वीज पडल्यानंतर त्या ठिकाणावरून अचानक जमिनीतून निळे पाणी येऊ लागले असे गावक-यांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर भूवैज्ञानिकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
हे पाणी जमिनीतून येत आहे की परिसरातून पाझरले आहे. याचा शोध हे पथक घेत आहे. अचानक जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. नेमका हा काय प्रकार आहे व पाण्याचा रंग निळा कसा झाला, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.