परभणी : आपल्या पारंपारीक संस्कृतीचे जतन व्हावे या दृष्टीकोनातून शहरातील अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने दि.८ रोजी साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक सामाजिक कार्यात साडी घालून सहभागी होत संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प सर्व महिलांनी केला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत साडी वॉकेथॉन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
साडी वॉकेथॉन रॅलीची सुरूवात राष्ट्रीय सहप्रभारी सरोज गट्टानी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. तर उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते महिलांच्या साडी संदर्भातील फलकाचे अनावरण पेढा हनुमान मंदिर परीसरात करण्यात आले. साडी नेसण्याच्या कलेचे ज्ञान पुढील पिढीला समजून सांगण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या साड़ी वॉकेथॉन कार्यक्रमात भगिनी आपल्या बालगोपाळा सोबत पारंपारीक वेशभुषा करून सहभागी झाल्या होत्या. यावेळी १०० भगिनींच्या उपस्थितीत हनुमानचालीसा पठन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्वांना शरबतचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उर्मिला अशोक सोनी, डॉ. अनिता नावंदर, राष्ट्रीय सहप्रभारी सरोज गट्टानी आदिंनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला तालुकाध्यक्ष ज्योति सोनी, सचिव नेहा दरक, कविता सारडा, नंदा बंग, स्नेहा जाजु, सरला दरक, वैशाली दरगड, किशोरी अध्यक्ष दीपिका बजाज, सचिव नंदिनी राठी, जानवी अजमेरा, मयूरी लोया, सेजल दरगड़ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.