निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहराचे आराध्य दैवत श्री निळकंठेश्वर मंदिर हेमाडपंथी असून या मंदिरालाही जुने रूप देण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड येथील उत्खनन विभाग व वास्तु विशारद विभागाने मंदिरास भेट देऊन जुने रूप आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या अनुषंगाने मंदिराची पाहणी केली आहे. तसेच मंदिर परिसरातील घरे, बारव विहिरींची पाहणी करुन आढावा घेतला आहे. लवकरच मंदिराचे काम सुरू होऊन पंढरपूरच्या धर्तीवर या मंदिरालाही जुने स्वरूप दिले जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ७० लाखांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.
निलंगा शहराचे आराध्य दैवत श्री निळकंठेश्वर मंदिर हे पुरातन असून, मंदिरावर अतिशय घडीव, रेखीव दगडी काम करण्यात आले आहे. मंदिरावर व बाहेरील भिंतीवर पौराणिक मूर्ती घडविण्यात आले आहेत. मंदिराचा शिलालेख उपलब्ध नसल्यामुळे हे मंदिर नेमके कोणत्या वर्षांत बांधण्यात आले याची नोंद कुठेही आढळली नाही. मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. परिसरात दगडी तळे, भुयारी मार्ग, बारव, विहिरीपर्यंत दगडी पाय-या असल्याचे लोक सांगत असतात मात्र या सर्व गोष्टीचा अभ्यास करून हे मंदिर मूळ रूपात कशाप्रकारे येईल यासाठी मंदिराची पाहणी करण्यात आली. यावेळी नांदेड पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, पुरातत्व जतन सहाय्यक बी.के .बनसोडे, पुणे असोसिएट वास्तु विशारदचे तेजस्विनी आफळे, पुरातत्व विभागाचे अभियंता नितीन चारुडे यांनी शनिवारी मंदिरास भेट दिली. मंदिर कमिटी सोबत चर्चा करण्यात आली. हे काम करत असताना आतून व बाहेरून केलेले रंगकाम काढून त्यास दगडी मूळ स्वरूप देण्यात येणार आहे. पुरातत्त्व वास्तूला अनावश्यक असणा-या सर्वच गोष्टी काढून त्या मूळ रूप आणण्यासाठी पुरातत्व शास्त्र संकेतानुसार काम करणार असल्याचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी सांगितले.
मंदिराला मूर्त स्वरूप व मूळ स्वरूप प्राप्त होणार असेल तर पंढरपूरच्या धर्तीवर याही मंदिराचे काम होणे गरजेचे आहे जर हे काम दुर्लक्षित झाले तर काही दिवसात मंदिराला गळती सुरू होईल. मंदिराचे काम मूळ स्वरूपात होणे गरजेचे असल्याचे मुख्याध्यापक दत्ता शाहीर यांनी सांगितले. मंदिर मूळ रूपात येण्यासाठी काही दिवस बंद जरी असले तरीही आम्ही भक्तगण ते सहन करू मात्र मंदिराची मूळ रूपात येणे महत्त्वाचे आहे असे येथील भक्तांनी सांगितले.