19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयचंद्राबाबू नायडू यांनी घेतली आंध्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ;  पवन कल्याण झाले उपमुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली आंध्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ;  पवन कल्याण झाले उपमुख्यमंत्री

विजयवाडा : आंध्र प्रदेशसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायडू यांच्यासह जनसेवा पक्षाचे सर्वेसर्वा अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेशही त्यात आहे. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आयोजित केलेल्या शपथविधी सोहळ्यात आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २५ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती, तर साऊथ चित्रपट क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेते रजनीकांत, चिरंजीवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील शपथविधी सोहळ्याला हजर राहून नायडू यांच्या सर्व मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या.

या नेत्यांना मिळाली नायडू मंत्रिमंडळात संधी

चंद्राबाबू यांच्या मंत्रिमंडळात किंजरापू अचेन्नायडू, कोलू रवींद्र, नदेंडला मनोहर, पी. नारायण, वांगलापुडी अनिथा, सत्यकुमार यादव, आपका रामनायडू, एनएमडी फारूक, अनम रामनारायण रेड्डी, पय्यावुला केशव, अंजनी कोलू सत्यप्रसाद, गोपालु सत्यप्रसाद, कांडला दुर्गेश, गुम्माडी संध्याराणी, ​​जनार्दन रेड्डी, टी. जी. भरत, एस. सविता, वासमशेट्टी सुभाष, कोंडापल्ली श्रीनिवास, मंडीपल्ली रामा प्रसाद रेड्डी आणि नारा लोकेश यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. नारा लोकेश चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आहेत.

पवन कल्याण अभिनयासह राजकारणातही झाले यशस्वी

नायडू यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या अभिनेता पवन कल्याण यांचे मोठे बंधू चिरंजीवी यांनी २००८ मध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली. मात्र, यानंतर चिरंजीवी यांनी प्रजा राज्यम पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर त्यांचे बंधू पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या १७५ जागा आहेत. यापैकी टीडीपीने १३५ जागा जिंकल्या आहेत. तर जनसेना पक्षाने २१ आणि भाजपने ८ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान अभिनेता पवन कल्याण अभिनयासह आता राजकारणातही यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल.
 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR