नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल द्विवेदी ३० जूनला जनरल मनोज पांडेंकडून पदभार स्वीकारतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवण्यात आला होता. आता ते ३० जूनला निवृत्त होणार आहेत. जनरल द्विवेदी सध्या जम्मू-काश्मीर रायफल्सचे अधिकारी आहेत. त्यांची फेब्रुवारी महिन्यात उपलष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी १५ डिसेंबर १९८४ रोजी सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी लष्करात विविध पदांवर काम केले असून, फेब्रुवारी २०२४ पासून त्यांनी उपलष्कर प्रमुखपद भूषवले. त्यांना चीन सीमेवर तसेच पाकिस्तान सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक देखील देण्यात आले आहेत.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे सैनिक स्कूल-रीवा, नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर आर्मी वॉर कॉलेजमधील हायर कमांड कोर्स आणि युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजमधील नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्समध्ये भाग घेतला.