धाराशिव : प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनास बसले असून बुधवारी (दि.१२) त्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही, याच्या निषेधार्थ धाराशिव येथील मराठा आंदोलन आक्रमक झाले असून त्यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी, तहसिद अशा दोन ठिकाणी कार्यालय इमारतीवर चढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. तसेच सरकारने सगे-सोयरे अधिसुचना तसेच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तात्काळ निर्णय घेवून पत्र द्यावे, अन्यथा इमारतीवरून खाली उड्या टाकून आत्महत्या करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची व पोलिसांची एकच तारांबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे हे ८ जूनपासून अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत, त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेणे अपेक्षित असताना बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस आहे. परंतु त्यांच्या उपोषणाची सरकारने कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, अभिषेक सुर्यवंशी यांच्यासह अन्य तिघे हे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर तर मनोज जाधव हे तहसिल कार्यालय इमारतीवर चढले असल्याचे समजते. ते खाली आल्यानंतरच सर्वांची नावे स्पष्ट होणार आहेत.
मुंबई वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकावरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन आक्रमक होवून जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर चढल्यानंतर या आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले असून स्वत: जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासह इतर अधिकारी त्यांना खाली उतरण्यासाठी विनंती करत आहेत. परंतू ते खाली उतरत नसून व मोठा पोलीस फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची डेडलाईन दिली आहे तोपर्यंत काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.