पंढरपूर : तालुक्यातील वाखरी येथील ५२ एकर जमिनीच्या खरेदीप्रकरणी दिलेले धनादेश न वटल्यामुळे तसेच बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी जळगाव येथील छोरिया प्रॉपर्टीज अॅन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्या विरोधात न्यायालयीन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैन यांनी दिलेले धनादेश न वटल्यामुळे सागर अनंता माने यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जैन यांच्या कंपनीने वाखरी येथील माने यांच्या ५२ एकर जमिनी खरेदीचा व्यवहार केला होता. मात्र यापोटी दिलेले काही धनादेश वटले तर उर्वरित धनादेश न वटल्यामुळे त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सदर जमिनीचा खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत विनंती केली होती. सदर फेरफार रद्द करण्याचा आदेश देखील प्रांताधिकारी यांनी दिला होता.
याची नक्कल मिळण्याकरिता माने यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला असता त्यांना धक्कादायकरीत्या पूर्वी खरेदी करतानाचा दस्त व दुय्यम निबंधक कार्यालयात दिलेल्या दस्त यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले.
या दस्तामध्ये सही व शिक्क्यामध्ये तफावत होती. तो बनावट केल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी येथील प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जळगाव येथील जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये फिर्यादी माने-कैकाडी यांच्यातर्फे अॅड. डी.एन. नायकू, सादिक शेख, सूर्यकांत कदम यांनी काम पाहिले.