नागपूर : प्रतिनिधी
खटल्यासाठी आणलेल्या एका कैद्याने बुधवारी सकाळी बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे खवळलेल्या वकील आणि लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याला जबरी मार बसला.
पोलिसांनी त्याला लोकांच्या गराड्यातून बाजूला खेचले. अनेकांनी त्याच्या कानशिलात वाजवली. तर काहींनी त्याला जोरदार प्रसाद दिला. यामुळे कोर्ट परिसरात एकच गोंधळ उडाला. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जयेश पुजारी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एका आयपीएस अधिका-याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका प्रकरणात त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर न्यायालयीन कक्षाच्या बाहेर येताच त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैदी जयेश पुजारी हा विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. त्याला सुनावणीसाठी आज सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ‘कोर्टात माझी तक्रार स्वीकारली जात नाही’ असा तक्रारीचा पाढा त्याने वाचला. त्यानंतर त्याने एकाएकी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या. उपस्थित लोक आणि वकिलांचा राग अनावर झाला. त्यांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याला लाथा-बुक्क्यांचा प्रसाद दिला. लोकांच्या तावडीतून पोलिसांनी त्याला सोडवले आणि एपीएमसी स्थानकात नेले. तिथे त्याची चौकशी करण्यात आली.