29 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रसिल्लोड तालुक्याला बदनाम करू नका

सिल्लोड तालुक्याला बदनाम करू नका

दानवेंच्या आरोपांवर सत्तारांचा पलटवार

सिल्लोड : प्रतिनिधी
मी जोपर्यंत दानवेंसोबत होतो, तोपर्यंत त्यांच्यासाठी चांगला होतो आणि आज वाईट झालो आहे का? आज मला दानवे, औरंगजेबाची उपाधी देतायत. मला किती बदनाम करायचं ते करा; मात्र माझ्या सिल्लोड तालुक्याला बदनाम करू नका, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंमध्ये लोकसभेच्या निकालानंतर नवा वाद पेटल्याचं चित्र आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर, एमआयडीसी, शासकीय कार्यालये गावाबाहेर नेण्याच्या नावाखाली नगर परिषदेचा उपयोग करून लोकांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. लोकांना दुकान, घरासाठी बांधकाम परवाने मिळत नाहीत. सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे, असा गंभीर आरोप केला होता.

त्यावर उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, राजकारणाचा उपयोग हा सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी केला तर लोक सोबत राहतात. नाही तर लोक मतदानातून आपली जागा दाखवतात. असेच लोकांनी रावसाहेब दानवेंना त्यांची जागा दाखवली, असे प्रतिउत्तर सत्तार यांनी दानवे यांना दिले.

सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय : रावसाहेब दानवे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवेंनी गंभीर आरोप केले आहेत. सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दांत रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. वाहिनीवरील एका कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली. सत्तारांनी सिल्लोडमधल्या जमिनी हडपायला घेतल्याचा आरोपही दानवेंनी केल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR