28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीय१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींसोबतच एकूण ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नवनिर्वाचित उमेदवार आता संसदेच्या अधिवेशनाची वाट पहात आहेत. कारण या अधिवेशनात त्यांना खासदारकीची शपथ देण्यात येणार आहे. दरम्यान, १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. देशाचे नवे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संसदेचे नवीन अधिवेशन सुरू होण्याच्या तारखेशी संबंधित माहिती शेअर केली होती.

नवीन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत चालणार आहे. यामध्ये नवीन सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली जाईल. याशिवाय सभागृहाच्या अध्यक्षांचीही निवड होणार आहे.

दरम्यान, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारचा रोडमॅप सादर करतील. संसदेचे अधिवेशन ३ जुलै रोजी संपणार आहे. संसदेच्या नव्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही चर्चा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR