25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeक्रीडापहिल्या वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

पहिल्या वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

बंगळूरू : दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौ-यावर आहे. भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात रविवार दि. १६ जूनपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि आशा शोभनाने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३७.४ षटकात १२२ धावांवरच सर्वबाद झाला. सुरुवातीला दिप्ती शर्मा, पुजा वस्त्राकर आणि रेणुका सिंगने दक्षिण आफ्रिकेला मोठे धक्के दिल्यानंतर मधली आणि खालची फळी पदार्पण करणा-या आशा शोभनाने उद्वस्त केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ धावा करताना मोठा संघर्ष करताना दिसला. दक्षिण आफ्रिकेकडून सुन लुसने सर्वाधिक ३३ धावा केल्या, तिच्याव्यतिरिक्त केवळ सिनालो जाफ्ता (२७), मारिझान कॅप (२४) आणि तांझमिन ब्रिट्स (१८) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना आशा शोभनाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच दिप्तीने २ विकेट्स घेतल्या, तर रेणुका सिंग, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २६५ धावा केल्या होत्या. भारताकडून उपकर्णधार स्मृती मानधनाने शतकी खेळी केली. तिने १२७ चेंडूत ११७ धावांची खेळी केली. या खेळीत १२ चौकार आणि १ षटकार मारला. तिच्याव्यतिरिक्त केवळ दिप्ती शर्मा आणि पुजा वस्त्राकर यांनाच ३० धावांचा टप्पा पार करता आला. दिप्तीने ३७ धााव केल्या, तर पुजाने नाबाद ३१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना आयाबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मसाबाता क्लासने २ विकेट्स घेतल्या, तर अ‍ॅनेरी डर्कसेन, नॉनकुलुलेको एमलाबा आणि शांगासे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR