28.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रखा. वायकरांच्या मेव्हण्याकडे ईव्हीएम अनलॉकचा मोबाईल

खा. वायकरांच्या मेव्हण्याकडे ईव्हीएम अनलॉकचा मोबाईल

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत केवळ ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला. त्यातच यात रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याची एंट्री झाल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकरविरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील लढत पुन्हा चर्चेत आली.

त्यावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टिव्हीटी नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. सध्या वनराई पोलिसांकडून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेतील डेटा ऑपरेटरकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे तर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यावर निवडणूक निर्णय अधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम वेगवेगळे आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो. त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो. त्यासाठी काही मोबाईल होते, त्यापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली.

ईव्हीएम हॅक होणे अशक्य
ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टिव्हीटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मोबाईल असणे हा वेगळा भाग आहे, मोबाईलचा ईव्हीएमशी कुठलाही संबंध नसल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR