28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeसोलापूरकनिष्ठ लिपिक देशमुखांना गैरहजर राहणे पडले महागात

कनिष्ठ लिपिक देशमुखांना गैरहजर राहणे पडले महागात

सोलापूर-
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक कलप्पा भगवान देशमुख यांना सेवेत विनापरवाना दीर्घकालीन गैरहजर न राहिल्या प्रकरणी कामावरून काढण्यात आले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त शितल – तेली उगले यांनी काढले आहेत.

सोलापूर महापालिकेतील आरोग्य – विभागात कनिष्ठ श्रेणी लिपिक या पदावर १० सप्टेंबर २०१४ पासून कलप्पा देशमुख हे कार्यरत असून कोणतीही पूर्व कल्पना न देता अथवा रजेचा अर्ज सादर करुन रजा मंजूर करुन न घेता दि.१ ऑगस्ट २०१६ पासून कामावर गैरहजर होते. कलप्पा भगवान देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या आरोग्य विभागाकडील दैनंदिन काम काजामध्ये अडचणी निर्माण झाल्या.

तसेच त्यांच्या त्यापूर्वीच्या सेवा कालावधीत दि. २६ एप्रिल २०१६ पासून ते दि.२९ जुलै २०१६ पर्यंत केलेल्या विद्युत दाहिनीच्या पावत्याचा ३४ हजार ५०० रुपये इतक्या कार्यालयीन रक्कमेचा भरणा केला नसल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे त्यांना दि.९ ऑगस्ट २०१६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दि.२८ सप्टेंबर २०१६ रोजी ३४ हजार ५०० रुपये कोषागारात जमा केले. यावरुन त्यांनी ३४ हजार ५०० रुपये इतक्या रक्कमेचा तात्पुरता अपहार केल्याचे निर्दशनास आले होते.

विभागीय चौकशीत कलप्पा देशमुख यांचेविरुध्द प्रशासनाने ठेवलेले दोषारोप सिध्द झाल्याने नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला. गैरहजर कालावधी हा ५ वर्षापेक्षा जास्तीचा असल्याने, अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांची कोणतीही रजा मंजूर करता येत नसल्याने महानगरपालिकेच्या सेवेतून गैरहजर राहिल्याच्या कारणावरून दि.१ ऑगस्ट २०१६ पासनू काढून टाकण्यात येत आहे, असे आयुक्तांनी काढलेले आदेशात म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR